टिळा
![]() |
Oriental White eye |
आपल्या समाजात कपाळी टिळा लावणे पूर्वापार चालत आलेली प्रथा आहे. अधिकतर टिळा लावण्याचा प्रघात धार्मीक विधीमध्येच दिसतो. कुणी अगदी सहज बाहेर जातांनासुद्धा कपाळी टिळा लावतो. कुणाचा देवीचा कुणाचा बजरंगबलीचा तर कुणाचा आणखी कोणत्या देवाचा. काही स्त्रिया आपले सौभाग्याची खूण म्हणून कपाळात लाल सिंदूर भरतात. प्रत्येक टीळ्यामागे धार्मीक वा सांस्कृतीक कारण असतेच. पण ही झाली मानवी समाजाची कहाणी. पक्षांमध्येही टिळा (Pollen Stains) लावून मिरविणारे असतातच की. आणी ते मोठ्या प्रमाणात बघायला मेळघाट जंगलासारखे दुसरे जंगल नाही. आपल्याकडे खालच्या भागात जसे उन्हाळ्यात पळस फुलतो तसा मेळघाटच्या भागात नदीकिनारी जागोजागी धायटी फुललेली दिसते. विशेषत: मेळघाटच्या डोंगरमाथ्यावर ही वनस्पती दिसते.
![]() |
Grey-breasted Prinia |
पळसाप्रमाणे गर्द
नारंगी फुलांमुळे या झुडुपाला संस्कृतमध्ये अग्निज्वाळा म्हटलं जात. ही रानफुले
हिवाळा संपत आलाकी धायटी आपल्या लाल केशरी रंगांनी फुलायला लागते. साधारण दोन ते
सोळा फुले पानांच्या बगलेत दाटीवाटीने गुच्छात उगवतात. फुलांमध्ये सहा पुष्पकोष
आणी सहाच पाकळ्या असतात. सहा पुष्पकोषशापासून १ ते १.५ से.मी. लांब छोटीशी हिरवी
नळी बनलेली असते ज्यातून नळी सारख्याच आकाराची नारंगी फुले उगवतात. प्रत्येक फुलात
१२ पुंकेसर आणी १ स्त्रीकेसर असतात. जे फुलातून तुर्याबप्रमाणे बाहेर निघालेले
दिसतात. धायटीच्या फुलामध्ये मोठ्या प्रमाणात मकरंद असतो. फुलपाखरे, मधमाश्या, मुंग्या, किडे-कीटक पक्षी या मकरंदाचा आस्वाद मनसोक्त घेतात. कोणत्याही वनस्पतींना
त्यांची प्रजा वाढवण्यासाठी बिया निर्माण करणे आवश्यक असते. त्यासाठी ते विविध
रंगामध्ये नटतात. सुवासाची भुरळ घालतात आणी मधुर रसाचे आमिषही दाखवितात. या
प्रलोभनाला भुलून किडे कीटक फुलपाखरे पक्षी फुलांकडे खेचले जातात. रसग्रहण
करण्याच्या नादात ते फुलांच्या परागकणांनी माखले जातात. ह्या फुलांचे परागकण
दुसरीकडे नेऊन फुलाला फळविण्याची मोठी कामगीरी ते बजावतात. Prinia, Oriental White-eye, धायटीच्या
फुलामध्ये आपले अक्षरक्ष: डोके घालून मधुरसाचे प्राशन करतात. तेव्हा परागकणाचा लाल
ठिपका लागून जातो. माथ्यावरच्या लाल पिवळ्या रंगाच्या ठिपक्यामुळे या पक्षांमध्ये
एखादी उपप्रजाती तर नाही ना? अशी शंका येते. Prinia, Oriental White-eye, सारखे छोटे पक्षी विशेषत: उन्हाळ्यामध्ये असा लाल, पिवळा रंगाचा टिळा लावलेले दिसतात.
Comments
Post a Comment