रंगीत पाणलावा नर मादी (Greater Painted Snipe) |
मानवी समाजात एकाच
व्यक्तीने आई व वडीलांची अशा दोन्ही भूमीका बजावणे याला एकल पालकत्व म्हणतात.
समाजाची उपेक्षा सहन करीत कुणी आवडीने तर कुणी नाईलाजाने ही भूमीका स्वीकारतात. वास्तवीक
पाहता एकल पालकत्वाचा भार पुरुषांपेक्षा महीलांवर अधीक पडलेला दिसतो. कदाचीत
स्त्रीच्या स्वभावातच पालकत्व असल्यामुळे तीच्या वाटेला ही जबाबदारी जास्त येत असावी. पक्षीजगतातसुद्धा
एकल पालकत्व दीसुन येते व मानवाप्रमाणेच नरापेक्षा मादीच पाल्याची जबाबदारी
स्वीकारतांना दीसुन येते. पण रंगीत पाणलावा(ग्रेटर पेंटेड स्नाईप) सारख्या
काही पक्षीप्रजाती याला अपवाद सुद्धा ठरतात.
सहसा पक्षांमध्ये मादीसोबत जोडी जमविण्यासाठी व
तीला आकर्षीत करण्यासाठी नर हा सुंदरच असतो. पण ईथे सगळा मामलाच उलटा आहे. रंगीत
पाणलावाची मादी अनेक नरांशी संबध ठेवणारी बहुपतिकत्व असते. तर नराचे दिसणे, वागणे, पालकत्व
भूमीका अगदी मादीसारखी असते. मध्यम आकाराच्या नराचा फिकट वीटकरी, काळसर
रंग अनाकर्षक दिसतो. नाही म्हणायला पंखावरची चटई विणल्यासारखी दिसणारी नक्षी छान वाटते.
पण मादीमध्ये हेच रंग गर्द स्वरुपात असल्यामुळे मादी अधिक सुंदर दिसते. आकारमानानेही
ती नरापेक्षा मोठीच असते. मीलनकाळात मादी हूट-हूट असा आवाज काढून नराला प्रणयासाठी
उत्तेजीत करते मात्र त्यावर त्याचा प्रतीसाद फारच अल्प असतो. नर अत्यंत लाजाळू
असल्याकारणाने जोडी जमविण्यापासून ते प्रणयापर्यन्त मादीच पुढाकार घेते. अशावेळेस
तीच्या हद्दीत दुसरी मादी आली तर तीला पिटाळून लावण्याची धमकसुद्धा ती ठेवते. उन्हाळ्यात
पाणथळीच्या ठीकाणी गवत व पाणवनस्पतीचे बसके घरटे उभारून मादी त्यात 3 ते 4 अंडी
देते. एकदाचे समागम आटपून अंडी दीली की संपली मादीची जबाबदारी। नंतर ती त्या
नरासोबत विभक्त होऊन दुसर्या नरा सोबत नीघून जाते. असे एका वर्षात ३-४ नरांशी ती
जोडी जमवितांना आढळते. नर मात्र मादी गेल्यानंतर अंडी उबवण्यापासून ते पिलांना
मोठे करण्यापर्यंतची सगळी जबाबदारी आनंदाने पार पाडतो. घरट्याच्या आसपास कुणी
शत्रु आल्यास जमीनीवर पंख पसरून लोळण घेत त्याचे लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न
करतो. अंड्यातून पिले बाहेर निघाल्यावर काही तासातच ते चालायला लागतात. नराच्या
मागे तीन किंवा चार पिले एका रांगेत शिस्तीने चालताना पाणथळ जागेत बरेचदा दिसून
येतात. त्यांच्या पंखाचा रंग आजुबाजुच्या वातावरणाला अनुसरून असल्याने एकदाचा नर
दिसून जातो पण पिले सहसा दिसून पडत नाही. धोक्याची चाहूल लागताच नर आपल्या पंखात
पीलांना सामावून घेत धोका टळेपर्यन्त एकाच ठिकाणी बसून राहतो.
रंगीत पाणलावा हा स्थानीक पाणपक्षाचा मुख्य
अधिवास तळ्याच्या, नदीकाठच्या पाणथळ जागा आहेत. हा रात्रीचर असल्याने
संध्याकाळ नंतरच हा आपल्या खाद्याच्या शोधात निघतो त्यामुळेच सहसा कुणाच्या नजरेस
पडत नाही. विदर्भात सर्वदूर रंगीत पाणलावाचा वावर असला तरी त्यांच्या प्रजननाच्या
द्रुष्टीने उपयुक्त असणारे त्यांचे हक्काचे अधिवास कमी होत आहे किंवा जे काही टिकून
आहे तिथे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याचे उत्तम उदाहरण वर्धा जिल्हातील
पुलगाव येथे पाहायला मिळते. येथील जुन्या पुलाजवळील नदीच्या पात्रात मोठ्या
प्रमाणात रंगीत पाणलावे प्रजनन करतात. एप्रिल महिन्यात आठ ते नऊ जोड्या एकाचवेळेस
पाहायला मिळतात. येथील पाण्यात त्यांचे मुख्य खाद्य कृमी, अळीचे प्रमाण व नदीतील
पाणवनस्पती भरपूर असल्याने त्यांची संख्या वाढलेली दिसते. पण तेथील वाढत असलेल्या
वीटभट्या व कारखान्यातील प्रदुषीत पाण्यामुळे हे प्रजननाचे प्रमाण मात्र अगदी नगण्य
होत चालले आहे. नदीच्या पात्रात वाहून आलेले प्लास्टीक सर्वत्र पसरल्यामुळे त्यांना
तीथे मुक्तपणे वावरनेही कठीण जाते. अमरावतीच्या जवळील छत्री, सावंगा, शेवती, केकतपुर
या तलावावरील या पाणथळ जागेत रंगीत पाणलावे हमखास आढळतात. पण या जागेचीही अवस्था सौंदर्यीकरण, मासेमारी,
बेसुमार गाळ उपसा, मानवी वावर ई.कारणामुळे दिवसेंदीवस बीकट होत आहे.
याला कारण कदाचीत मानवाचे नैसर्गीक पाणथळ जागेकडे पर्यायाने निसर्गाकडे होणारे
दुर्लक्ष असेल. त्यामुळे एकल पालकत्वाची जबाबदारी समर्थपणे पार पाडणार्या रंगीत
पाणलावा या प्रजातीला मानव प्रजातीचा हा उपेक्षीतपना नक्कीच माहागात पडेल..
Comments
Post a Comment