शेष नामशेष

पुरातन काळापासुन मानवाची वस्ती समुद्रकीनारी अथवा नदीकाठी वसलेली दिसून येते. येथे मानवाच्या मोठ्या मोठ्या वसाहती वसल्या व समृद्ध झाल्या. जीथे नदी, तलाव यासारख्या पाण्याच्या स्त्रोताची उपलब्धता आहे तीथे शहरी अथवा ग्रामीण भागातल्या गरजा भागवल्या जाऊ लागल्या. समुद्र,नदी,तलाव यासारख्या जलसाठयाची आवश्यकता जशी मनुष्याला तशी पक्षांनासुद्धा असतेच. विशेषकरून ज्या पक्षांचे प्रजनन नदी,तलावामध्ये अथवा त्याच्या काठावर होते त्यांना अशा पाण्याच्या स्त्रोतावर अवलंबून राहावे लागते. टीबुकली(लिटिल ग्रेब),कमळपक्षी(फेजंट टेल्ड जकाना),वारकरी(युरेशीयन कूट) यासारखे पक्षी पाण्यावर आपले घरटे उभारतात. तर भारतीय धावीक(इंडियन कोर्सर),छोटा आर्ली(स्मॉल प्राटिनकोल),चीखल्या(लीटील रिंग प्लोवर) सारख्या प्रजाती पाण्याच्या काठावर आपले घरटे उभारून प्रजनन करतात. उन्हाळ्यात तळ्याच पाणी सुकून जाते आणी तात्पुरती बेटं तयार होतात अशा बेटावर खुरट्या वनस्पतीशीवाय फारसे काही उगवत नाही. विदर्भात बर्‍याच तळ्याकाठी अशी बेट तयार झालेली दिसतात व अशा ठीकाणी उन्हाळी प्रजनन करणार्‍या स्थानीक व स्थलांतरीत पाणपक्षी प्रजाती आपली वीणवसाहत करतात. विदर्भामध्ये केंटीश चीखल्या(केंटिश प्लोवर),छोटा सुरय(लिटिल टर्न),प्राच्य आर्ली(ओरीएंटल प्राटीनकोल) हे स्थलांतरीत पाणपक्षी उन्हाळी प्रजननासाठी येतात. अमरावती शहराच्या आजूबाजूला असणार्‍या २७ तलाव अथवा पाणवठयापैकी केवळ ५ तलावावर यांची वीण वसाहत दिसून येते. त्यापैकी युरोपीय देशातून येणारा केंटीश प्लोवर व लिटील टर्न ची वीण शेवती, सावंगा विठोबा, अप्परवर्धा, केकतपुर येथे दरवर्षी होते. विदर्भात लिटील टर्न ही प्रजाती दुर्मिळ आहे त्यामुळे त्यांच्या या वीण वसाहतीची जागा महत्वाची ठरते. आणी ओरीएंटल प्राटीनकोल ची वीण वसाहत तर विदर्भात बोटावर मोजण्याईतकी उरली आहे.
मोर्शी येथील अप्परवर्धा धरणाच्या मागील बाजूस तयार होणार्‍या बेटावर ओरीएंटल प्राटीनकोल दरवर्षी युरोपीय देशातून प्रजनानासाठी येतो. त्यामुळेच याजागेचे महत्व अधोरेखीत होते. या ठीकाणी एकाच बेटावर प्लोवर प्रजाती च्या लिटिल व केंटीश, टर्न मध्ये लिटील व रिव्हर आणी स्मॉल प्राटीनकोल ची व ओरीएंटल प्राटीनकोल या स्थानीक व स्थलांतरीत प्रजातींची ची वीणवसाहत एकत्र पाहायला मिळते. गोलाकार असलेल्या या बेटावर स्थलांतरीत प्रत्येक प्रजातीची घरटी १५ ते २० या संख्येत आढळतात. यावरून स्थलांतरीत पाणपक्षी या ठीकानाला चागलीच पसंती देतात असे दिसते. या सर्व पाणपक्षांची घरटी उघड्या जमीनीवर रेती,खडे गोळा करून बनवलेली असतात. स्वत:ला अंडी उबवताना बसता येईल एवढे खोलगट उथळ आकारमान घरट्याचे असते. सुरवातीस साध्या डोळ्यांनी एकही घरटे दिसत नाही पण प्रयत्नपूर्वक पाहीले तर केंटीश प्लोवर,लिटिल टर्न अंडी उबवताना बसलेले दिसतात. उन्हाचा तडाखा जसा वाढत जातो तसे अंड्याचे तापमान संतुलीत राखण्यासाठी आपले पोट पाण्यात भीजवीने व पुन्हा अंड्यावर बसने ही क्रिया वारंवार या पाणपक्षांना करावी लागते आणी त्यामुळेच त्यांची घरटी कुठे आहे याचा शोध लागतो. बेटाजवळ कुणाची उपस्थीती आढळल्यास टर्न,प्राटीनकोल एकच गोगांट करतात. यावरूनही त्यांच्या वीणवसाहतीची व तीथे त्यांना वारंवार उदभवणार्‍या धोक्याची कल्पना येते. मागील १० वर्षाचा इतीहास पाहीला तर या बेटाला सर्वात मोठा धोका हा मासेमारी व शेती यापासून आहे. काही मासेमार मासे पकडण्यासाठी बेटावरच आपला मुक्काम ठोकतात व आपल्या झोपड्या उभारतात. त्यामुळे साहाजीकच त्या वर्षी तेथील घरट्याचे प्रमाण २० ते ३० टक्यावर येते. बेटावर तुटून पडलेल्या जाळ्यात अडकून बरेच पाणपक्षी जखमी होतात. धरणाच्या मागील बाजुस गाव असल्यामुळे तीथे शेतीही मोठ्या प्रमाणात आहे. उन्हाळ्यात धरणाच्या गाळाने सुपीक झालेल्या भागावर या शेतीचे अतीक्रमण होऊ लागते. खरबुज,फल्ली अशी नगदी पिके येथे घेतली जातात त्यासाठी वीणवसाहतीच्या जवळील अधीकाअधीक भाग ग्रहण होतो, सिंचनासाठी वापरण्यात येणारे विद्युतपंपाचा मोठा आवाज, पीकावर फवारणी करण्यात येणारे तणनाशक,कीटकनाशक यांचा वाढता वापर आणी शेतीचे काम करण्यासाठी तिथे माणसांचा होणारा वावर हे येथील प्रमुख धोके आहेत व याचा सगळ्यात मोठा फटका ओरीएंटल प्राटीनकोल याला बसलेला दिसतो कारण पहिले ६ ते ७ संख्येत दिसणार्‍या घरट्याचे प्रमाण आता केवळ १-२ वर आले आहे. यावर्षी तेही दिसले नाही फक्त २ ओरीएंटलची उपस्थीती आढळली. याचा अर्थ विदर्भात दुर्मीळ असलेल्या या प्रजातीचे प्रजनन आपण येत्या काही वर्षात नामशेष होताना बघु. आणी केवळ ओरीएंटल प्राटीनकोलच नाही तर दरवर्षी स्थलांतरीत पक्षांसोबत दिसणारा दुर्मीळ पाणचीरा(इंडियन स्कीमर) मागील दोन वर्षापासून दिसला नाही. स्मॉल प्राटीनकोन चे हजारच्या आसपास दिसणारे थव्याचे प्रमाण आता शेकड्यावर आले आहे.
जेव्हा नैसर्गीक धोक्यापेक्षा मानवनीर्मीत धोक्याची तीव्रता वाढते तेव्हा मानवालाच काही प्रयत्न करणे गरजेचे असते. ३ वर्षा अगोदर वन्यजीव पर्यावरण सवर्धन संस्थेचे सदस्यांनी मोर्शीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी यांची भेट घेऊन या जागेचे महत्व पटवून दिले तसेच येथील धोक्यामुळे पाणपक्षांचे प्रजनन कसे नष्ट होत आहे हे त्या बेटावर जाऊन त्यांच्या निदर्शनास आणून दिले. तेव्हा त्यांनी मासेमारांच्या राहुटया तेथून हटवल्या व त्याचा अपेक्षीत परिणामसुद्धा पाणपक्षांचा प्रजननावर पुढीलवर्षी दिसून आला. आपले हे छोटे-छोटे प्रयत्नसुद्धा पाणपक्षांच्या वीणवसाहतीला फायदेशीर ठरू शकतात. तेव्हा आपण सर्व पक्षीनिरीक्षकांनी आपल्या परिसराशेजारी आढळणार्‍या पाणपक्षांच्या वीणवसाहतीचा अभ्यास व त्याचे सवर्धन करणे गरजेचे ठरते. नाहीतर आता दिसणार्‍या शेष जातींचे आस्तीत्व नामशेष व्हायला वेळ लागणार नाही.

Comments