साईक्सचा चंडोल |
सजीवसृष्टीतील उत्क्रांतीदरम्यान मेंदुचा थोडाफार विकास
झालेल्या प्रत्येक प्राण्यामध्ये ईतरांची नक्कल करणे ही खुबी सर्वसामान्यपणे दिसून
येते. लाखो वर्षापासून वेगवेगळ्या प्रजाती आपल्या अस्तित्वासाठी एकमेकांच्या नकला
करीत आलेल्या आहेत. मनुष्यप्रजातीमध्ये बुद्धीचा विकास एवढा झपाट्याने झाला की काही
काळातच नकलेचा उपयोग ते केवळ आपल्या करमणुकीसाठी करू लागले. भाषेचा विकास
झाल्यानंतर त्यामध्ये आवाजाची नक्कल करण्यावर जास्त भर दिला गेला. एखाद्याच्या खास
लकबीची,आवाजाची नक्कल करतांना हुबेहूब
आवाज जो काढला जातो त्याला मिमीक्री म्हणतात. वलयांकीत लोकांच्या आवाजाची नक्कल
करणारा मिमीक्री आर्टीस्ट म्हणून नावारूपास येतो. अर्थातच तो त्यात स्वत:चा छंद
जोपासुन अर्थाजनही करू शकतो. पक्षी मात्र स्वत:चे अस्तीत्व टिकवण्यासाठी मिमीक्री(ईमीटेशन)
करतात. पक्षीविश्वामध्ये प्रत्येक
पक्षी ईतर पक्षांची काहीना काही नक्कल करीतच असतो. यामध्ये वेगवेगळे कारणे आहेत.
गोरली चंडोल Rufous-tailed Lark
सगळ्यात
महत्वाचे म्हणजे आपली पुढील संतती निर्माण करण्यासाठी जोडीदाराला आकर्षीत करणे. प्रियराधनासाठी
जसे गाण्याची आवशकता आहे तसेच ईतर पक्षांच्या नकलीचीही आहे. कारण मादी
जास्तीतजास्त पक्षांच्या आवाजाची नक्कल करणार्या नराला पसंती देते. मंजुळ सुरातील
गाण्यासोबत गाण्याच्या मधे-मधे आपल्या आजुबाजुच्या पक्षांच्या आवाजाची हुबेहूब
नक्कल करण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्षी करतो. मादी जोडीदाराची पसंती मिळाल्यानंतर त्यांचा
संसार सुरू होतो त्यासाठी घरटे उभारले जाते. घरट्याजवळ कुणा शिकारी पक्षी येत
असल्यास आवाजाची नक्कल करून त्यांना हुसकावून लावले जाते. बर्याचदा खाटीक(Shrike),कोतवाल(Drongo) यासाख्या हिमंतबाज पक्षांची नक्कल केली जाते. कारण हे
पक्षी आपल्यासोबतच ईतरांच्या घरट्याची सुरक्षासुद्धा करीत असतात. मुळात हे दोघेही
उत्तम नकलाकार म्हणुन प्रसिद्ध आहे. तरीही आपल्या आक्रमक स्वभावामुळे स्वत:च्या
घरट्यात शत्रू आला तर त्यांना ईतरांची नक्कल करण्याची बहुधा गरजही पडत नसावी. कोकीळ
प्रजातीचे पिलु दुसर्याच्या घरट्यात असतांना आपल्या संगोपन करणार्या
मात्या-पित्याचा आवाजाची हुबेहूब नक्कल करतो. यामुळे त्याला खाद्यही जास्त प्रमाणात
मिळते. बरेचदा स्वत:ची हद्द सुरक्षीत ठेवण्यासाठीही नकलेचा वापर केला जातो. आपल्या
प्रजातीसोबतच ईतरांना धोक्याची सूचना देण्यासाठीही त्या शत्रूच्या आवाजाची नक्कल
करून सावध केले जाते. पक्षांच्या नक्कल
करण्यामागे यासोबत बर्याच बाबींचा समावेश असतो. त्याचा उलगडा होण्यासाठी त्या-त्या
पक्षांच्या अधिवासात जावून त्याचे निरीक्षण करणे गरजेचे आहे. आणी यासाठी आधुनीक
तंत्रासोबत अंगी संशोधकवृत्ती असणेही आवश्यक आहे. हे प्रत्येकवेळी शक्य होईल असे
नाही. मात्र काही पक्षांचा नकलांचा हा कार्यक्रम सहजपणे पाहता येतो अनुभवता येतो. त्यासाठी
गाव,शहराच्या आजुबाजूला असलेले माळरानावर
पावसाळयात मारलेला चक्कर पुरेसा आहे. चंडोल(लार्क) फिकट मातकट रंग व चिमणीच्या
आकाराची असणारी प्रजाती माळरानावर सर्वत्र आढळते. वीणीच्या हंगामात ती गायन व ईमीटेशन करतांना
दिसून येते. दुर्लक्षीत असल्या कारणाने त्यांच्याकडे फारसे लक्ष दिल्या जात नाही. मात्र
त्यांच्यातीलच एक साईक्स लार्कची प्रजातीची ओळख एक उत्तम नकलाकार म्हणून होत
असल्याने त्यांच्याकडे थोडेफार लक्ष जाऊ शकते. साईक्सचा चंडोल हवेत गाणे गातांना
विदर्भातील पाच
स्थानीक लार्क प्रजातीपैकी एक साईक्स लार्कची वीण जुलै महीन्यापासून चालू होते. व
सप्टेंबर मध्ये ती चांगलीच बहरात येते. खुरट्या गवताळ माळरानावर जोडीदार
मिळवण्यासाठी सर्व साईक्स नर एकवटले जातात. माळरानावरील उंचवटा अथवा झुडुपाचा
बुंधा हेरून तिथे गायन आणी नकलाचा कार्यक्रम चालू होतो. मिलनाच्या काळात
संध्याकाळी अंधार पडल्यावरही हा नकलांचा कार्यक्रम चालूच असतो. बरेच साईक्स नर
वेगवेगळ्या ठिकाणी बसून आवाज काढतात. ही कृती ते आपली हद्द सांगण्यासाठी वा
सुरक्षीत करण्यासाठी करीत असावे. नकलेमध्ये त्यांच्या आजूबाजूला आढळणार्या बुलबुल,तीतर,सातभाई,टीटवी या पक्षांचा जास्त समावेश
असतो. अगदी खारुताईच्या आवाजाची नक्कलही केली जाते. आकाशात शंभर फुटापेक्षाही उंच
जाऊन एकसारखे पंख फडफडत गाणे आणी ईमीटेशन करणे चालूच असते. वास्तवीक पाहता एवढ्या
उंचावर जावून मादी जोडीदाराला आपल्या कौशल्यासोबतच त्यांना आपली शारीरीक क्षमता
सिद्ध करावयाची असते. वर जाणे व दहा ते पंधरा मीनीटांनी खाली येऊन पुन्हा नव्याने
गायनाला सुरवात करणे. असे वारंवार चालू राहते. मादी एका ठिकाणी बसून सर्व नरांवर लक्ष ठेवून असते. मनुष्यप्रजाती
मधील ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ ही म्हण ईथेही लागू पडते. पक्षांमध्ये जसे वेगवेगळे
प्लमेज(पक्षाची पिसे) दिसतात. साईक्स लार्क मध्ये फ्रेश प्लमेज(नवीन),वर्न प्लमेज(थोडा जुनाट) व्हेरी वर्न प्लमेज(जुनाट)
आढळून येतो. म्हणजे नुकताच तारुण्यात प्रवेश केलेला,वयस्क आणी थोराड असे याचे ढोबळमानाने वर्गीकरण करता येईल. या
नकलेच्या खेळामध्ये नविन तरुणांपेक्षा वयस्क नर आपल्या अनुभवाचा फायदा घेत
जास्तीतजास्त पक्षांची नक्कल चांगल्या प्रकारे करतात. अर्थातच मादी जोडीदार
मिळवण्याचे प्रमाणही त्यांचे तरुणांपेक्षा जास्तच असते. पण तरुण साईक्स वयस्क
नरांकडून शिकतात आणी नकलेचा गुण प्रयत्नाने विकसीतही करतात. तीन वर्षाअगोदर
अमरावतीमध्ये विदर्भातील लार्क प्रजातीवरील आंतरराष्ट्रीय दर्जाचा एक अर्ध्या
तासाचा माहीतीपट बनविण्यात आला. त्याच्या चित्रीकरणात साईक्स लार्क १८ प्रकारच्या
पक्षांच्या आवाजाची नक्कल करतांना आढळून आला. एका संशोधनानुसार साईक्स लार्क ३४ प्रकारच्या
पक्षांची नक्कल करू शकतो त्यात मेंढपाळाच्या शिट्टीचाही समावेश आहे. कदाचीत
यापेक्षा जास्तही तो करीत असेल ते पुढील संशोधनातून दिसूनच येईल. पण एक मात्र खरे पक्षीविश्वात
जोडीदार मिळविण्यापासून ते स्वत:ची सुरक्षा करण्यापर्यन्त नकलेचा वापर थोड्याफार
प्रमाणात केलाच जातो. ‘नक्कल करायलाही अक्कल लागते’ असे म्हणतात ते उगाच नाही|
Comments
Post a Comment